मुंबई 24x7 ला राज्य मंत्रिमंडळाची मंंजुरी; 27 जानेवारीपासून शहरात 'नाईट लाईफ' सुरू
Mumbai Night Life | Photo Credits: Twitter

मुंबई शहरामध्ये नाईफ़ लाईट (Mumbai Night Life) सुरू करण्याबाबत असलेला संभ्रम आज संपला आहे. येत्या 27 जानेवारीपासून मुंबई शहर 24 तास खुले राहणार आहे. दरम्यान हा निर्णय बंधनकारक नसेल असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या नाईट लाईफ प्रोजेक्टमुळे पोलिसांवर ताण येणार नाही असे म्हटलं आहे. पब आणि बार यांच्या वेळ मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच  रात्री 1.30 वाजेपर्यंत असेल असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई मध्ये 'नाईट लाईफ' मुळे महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होईल: भाजपा नेते राज पुरोहित

मुंबई 24 तास खुली ठेवण्याबाबत सरकारच्या निर्णयावर भाजपा नेत्यांकडून टीका केली जात आहे. आज मुंबईमध्ये बोलताना आशिष शेलार यांनी हा प्रकल्प नाईट किलिंग असेल, या आडून भ्रष्टाचाराची सुरूवात होऊ शकते असे म्हटले आहे. तर राज पुरोहित यांनी या नाईट लाईफमुळे निर्भया बलात्कार प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे.

24 तास मुंबई खुली ठेवण्याच्या निर्णयामध्ये आता मिल परिसरातील मॉल, उपाहारगृहं आणि हॉटेल्स खुली राहणार आहेत. तर सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था असणार्‍या ठिकाणी मुंबईकरांना खाण्याच्या सोयीप्रमाणेच आता शॉपिंगचा आनंदही रात्रीच्या कोणत्याही वेळी घेणं शक्य होणार आहे. हा प्रकल्प मुंबईचा आर्थिक विकास करण्यासाठीदेखील मदत करेल असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे.