Dadaji Bhuse (Photo Credit- Facebook)

Dadaji Bhuse Tests Positive For COVID-19: राज्यात कोरोना विषाणूचं (Coronavirus) संकट अद्याप कमी झालेलं नाही. आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोना विषाणूचा विळखा बसला आहे. महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. शिवसेना नेते आणि कृषी मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या दादाजी भुसे यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत.

दादाजी भुसे यांनी आपल्या ट्विटमध्ये आहे की, 'माझी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन.' (हेही वाचा - Mumbai Schools To Remain Shut Till January 15: मुंबईतील सर्व शाळा 15 जानेवारीपर्यंत बंदच राहणार; महानगरपालिकेचा मोठा निर्णय)

प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सतत प्रवास झाल्याने दादाजी भुसे यांना पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचं समजलं.

दरम्यान, आतापर्यंत महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अस्लम शेख, अब्दुल सत्तार, संजय बनसोड, आदी मंत्र्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. मात्र, या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.