भाजपने (BJP) सध्या राज्यात जे तोडफोडीचे राजकारण सुरु केले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. भाजपला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीनेही (NCP) कंबर कसली आहे. यासाठी 'नव्या स्वराज्याचा नवा लढा', असा नारा देत राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रा (ShivSwarajya Yatra) सुरु करत आहे. 6 ऑगस्टपासून, शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर येथून या यात्रेला प्रारंभ होईल. 6 ते 28 ऑगस्टला या दरम्यान ही यात्रा चालेल. यामध्ये राज्यातील 22 जिल्हे, 80 तालुके आणि 3 हजार किलोमीटरचा प्रवास होणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही महाजनादेश यात्रा सुरू झाली आहे.
या यात्रेचे नेतृत्व अभिनेते व राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे करणार असून, साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यात्रेचे स्टार प्रचारक असणार आहेत. ही यात्रा दररोज तीन विधानसभा मतदार संघामध्ये जाणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार आहे. हाच पक्षाचा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे याआधी जयंत पाटील यांनी सांगितले होते. मात्र आम्ही कोणाच्या विरोधात ही यात्रा काढत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (हेही वाचा: आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद, शिवसेना-भाजप जागावाटप, ओबीसी आरक्षण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?)
या यात्रेत तरुणांची नोंदणी केली जाणून असून, त्यांच्या भविष्याबाबत, महाराष्ट्रातील समस्येबाबत, काही महत्वाच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला जाणार आहे. मात्र हे सर्वांनाच माहिती आहे की ज्या वेगाने राष्ट्रवादीमधील आमदार भाजप-शिवसेनेट प्रवेश करत आहे त्यामुळे पक्ष पूर्णतः हादरला आहे. आता जितके लोक पक्षात आहेत त्यांच्यात तरी एकी ठेऊन नवचैतन्य निर्माण करणे गरजेचे आहे, म्हणूनच या यात्रेचा घाट घातला गेला आहे.