BJP Maha Janadesh Yatra: आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद, शिवसेना-भाजप जागावाटप, ओबीसी आरक्षण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Chief Minister Devendra Fadnavis | (Photo credits: file photo)

BJP Maha Janadesh Yatra: शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास आपण तयार आहोत, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले आहे. तसेच, विधानसभा निवडणूक 2019 भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युतीतच लढतील. तसेच, जागावाटपाचा प्रश्न दोन्ही पक्ष चर्चेने सोडवतील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालणार नाही, लोकसंख्येनुसार ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

विधनसभा निवडणूक 2019 डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या महाजनादेश यात्रेचा आज तिसरा दिवस होता. ही यात्रा आज (3 ऑगस्ट 2019) नागपूर येथे पोहोचली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी युती, आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद, ओबीस आरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, या आधी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबबाबत वक्तव्य केले होते.

आदित्य ठाकरे यांना सरकारमध्ये पाहायला आवडेल

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांना सरकारमध्ये पाहायला आवडेल. त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यास कोणतीही अडचण नाही. खरे तर, त्यांना आजही आम्ही हे पद देऊ शकतो. त्यांनी निवडणूक लढविल्यास ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढविणारे ते पहिले सदस्य ठरतील. त्यांमुळे त्यांना सरकारमध्ये पाहायला आवडेल. दरम्यान, युतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात आणि देशातही भाजप हा जरुर मोठा पक्ष आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप एकत्रच लढतील. आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा, BJP Maha Janadesh Yatra: भाजप हाऊसफुल, आमची मेगाभरती नव्हे तर, लिमिटेड भरती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

कसे असेल युतीचे जागावाटप

युतीच्या जागावाटपाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना - भाजप हे दोन्ही पक्ष समसमान जागांवर लढतील. दोन्ही पक्ष साधारण 130 ते 140 जागांवर लढतील. उर्वरीत जागा मित्रपक्षांना सोडण्यात येतील. 2014 मध्ये आम्ही वेगवेगळे लढलो होतो. त्या निवडणुकीत भाजप 122 तर शिवसेना 66 जगांवर निवडणुक जिंकला होता. आता आम्ही सोबत समसमान जागांवर लढत आहोत. दरम्यान, आता किती जागांवर विजय मिळेल हे स्पष्ट सांगता येत नसले तरी, ती संख्या पाठीमागच्या संख्येपेक्षा नक्कीच अधिक असेल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

 आरक्षणावर घाला घालणार नाही

दरम्यान, नागपूर येथे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालणार नाही. ओबीसींना मिळणारे राजकीय आरक्षण लोकसंख्येनुसार मिळणार आहे. गेली अनेक वर्षे राज्यात जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण आहे. त्यात मागास प्रवर्गाला 27 टक्के आरक्षण आहे. ज्या ठिकाणी एससी, एसटी आरक्षण 23 टक्के पेक्षा जास्त आहे. तिथे राजकीय आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसं आरक्षण देणं संवैधानिक नाही. तिथे राजकीय आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसं आरक्षण देणं संवैधानिक नाही. त्या ठिकाणी तसं आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयानेच नकार दिला आहे. त्यामुळे सरकार न्यायालयात गेले आहे. या प्रकरणावर पुढील आठवड्यात सुनावणी असल्याचे मुक्यमंत्र्यांनी सांगितले.