Monorail employees also on strike in Mumbai?: वाहतूक कोंडी, गर्दी, उकाडा, घाम आणि सततची धावपळ यांमुळे आगोदरच जेरीस आलेले मुंबईकर सततच्या संपामुळे हैराण झाले आहेत. सलग चौथ्या दिवशीही बेस्ट वाहतूक कर्मचाऱ्यांचा संप (BEST Strike ) सुरु आहे. हा संप सुरु असतानाच आता मोनो रेल (Monorail) कर्मचारीही संपावर गेल्याचे वृत्त आहे. मोनो रेलचे सुमारे 198 कर्मचारी गुरुवारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मोनो रेल प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र, एका कर्मचाऱ्याच्या हवाल्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या वृत्तात प्रशिक्षणार्थी तरुणांच्या सहाय्याने मोनोचा कारभार सुरु असल्याचे लोकसत्ता ऑनलाईनने म्हटले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा जरूर विचार केला जाईल. पण, कर्मचारी जर संपावर गेले तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे Metropolitan Region Development Authority ने म्हटले आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतची रक्कम चेक स्वरुपात देण्यात येईल. तशी प्रक्रियाही सुरु झाली आहे. मात्र, त्यासाठी काही अवधी लागणार आहे, असेही Metropolitan Region Development Authority ने म्हटले आहे.
दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांप्रमाणे अनेक विविध मागण्या मोनो रेल कर्मचाऱ्यांनीही ठेवल्या आहेत. वेतनवाढ, एमएमआरडीची वेतनश्रेणी द्यावी किंवा एमएमआरडीएच्या कंत्राट वेतनश्रेणीवर घेणे अशा प्रकारच्या काही अनेकदा मागणी करुनही मोनो प्रशासनाने गेले साडेपाच वर्षे एकदाही वेतनवाढ केली नाही, असाही आरोप मोनो प्रसासनावर कर्मचारी करत आहेत. हे कर्मचारी थेट संपावर गेले नाहीत तर, या आधी अनेकदा या कर्मचाऱ्यांनी प्रशासनास तशी कल्पना दिली होती सांगितले जात आहे. (हेही वाचा, बेस्टनंतर आता मोनोरेल कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; पहा काय आहेत त्यांचा मागण्या)
दरम्यान, मुंबईतील संपाच्या हत्यारावर वेळीच तोडगा निघाला नाही तर, मुंबईकरांच्या अडचणींची जागा हाल या शब्दात व्यक्त करण्यासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. बेस्टच्या बसेस सुरु नसल्याने मुंबईची वाहिणी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर अधिक ताण पडतो आहे. त्यातच मोनो कर्मचाऱ्यांचाही संप सुरु झाल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, BEST STRIKE : तोडगा नाही, चौथ्या दिवशीही बेस्ट वाहतूक कर्मचारी संप कायम; इलेक्ट्रीक युनियनचाही संपाला पाठिंबा)
बेस्टचा संप म्हणजे आपल्याला कमाई करण्याची संधी असे सूत्र मानत काही रिक्षावाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. यात टॅक्सीवाल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांची अधिकच कोंडी होत आहे. सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी घरी परतताना त्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे.