बेस्टनंतर आता मोनोरेल कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; पहा काय आहेत त्यांचा मागण्या
मुंबई मोनोरेल (Photo Credits: PTI)

Mumbai Monorail Strike : मुंबईच्या बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, यात संपूर्ण मुंबई होरपळत आहे. आज संपाचा तिसरा दिवस, मात्र अजूनही हा संप मिटण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अशातच मुंबई मोनोरेल (Mumbai Monorail)  कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर संप करू असा इशारा दिला आहे. डिसेंबर महिन्यातील वेतन आणि अपेक्षित पगारवाढ मिळाली नाही तर तब्बल 250 मोनोरेल कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. सध्या MMRDA ला विचार करून निर्णय घेण्यासाठी काही काळ अवधी देण्यात आला आहे. (हेही वाचा : Best Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची तिसऱ्या दिवशीही संपाची हाक, रस्त्यावरुन बस धावणार नाही?)

कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याचे वेतन अजूनही दिले गेले नाही. तसेच गेली 5 वर्षे कर्मचाऱ्यांची पगारवाढ झालेली नाही, यामुळे कर्मचारी नाराज आहेत. कर्मचाऱ्यांनी MMRDA आणि मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यात्त त्यांनी सांगितले आहे की, 10 जानेवारीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संप पुकारला जाईल. याबाबत MMRDA चे कमिशनर आर.ए.राजीव यांनी सांगितले आहे की, संप करण्याची वेळ येणार नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात येतील.  MMRDA चे प्रवक्ते दिलीप कवठकर (Dilip Kawathkar) यांनी सांगितले आहे की, आम्ही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि या मागण्यांवर विचार करून लवकरच हा मुद्दा आम्ही निकालात काढू. त्यामुळे संपाचा इशारा देण्याऐवजी त्यांनी आम्हाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

दरम्यान मोनोरेलचा पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा हा व्यवस्थित कार्यान्वित आहे. यामध्ये दिवसाला 1500 प्रवासी प्रवास करतात. वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा 2 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. हा प्रकल्प वेळेत सुरू होण्यासाठी एमएमआरडीएला एकूण 10 गाड्यांची गरज आहे. त्यापैकी 5 नवीन गाड्या येत्या आठवड्याभरात एमएमआरडीएच्या सेवेत दाखल होतील.