Best Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची तिसऱ्या दिवशीही संपाची हाक, रस्त्यावरुन बस धावणार नाही?
बस कर्मचारी संप (फोटो सौजन्य- ANI)

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा (10 जानेवारी) तिसरा दिवस आहे. परंतु बुधवारी बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटिसा धाडल्याने हा वाद अजूनच चिघळला आहे. त्यामुळे आजही बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. मात्र या स्थितीमुळे प्रवाशांचे नाहक हाल होताना दिसून येत आहे.

बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप दिसून येत आहे. तर बुधवार पासून कर्मचाऱ्यांना नोटिसा धाडून बेस्ट क्वाटर्समधील घर खाली करा असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. पण कमागार संघटना त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने अद्याप या प्रकरणी कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा प्रवाशांचे हाल होणार आहेत. अद्याप एकही बस आगाराबाहेर पडलेली दिसली नाही. (हेही वाचा-BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम, आजही प्रवाशांचे होणार हाल)

या स्थितीत रेल्वे प्रशासनाने मध्य आणि हार्बर मार्गावर जादा लोकल सोडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.परंतु बेस्टच्या वादावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यस्थी करणार असल्याचे सांगितले जात आहे. तर कृती समितीचे नेते शशांक राव यांच्यासह कर्मचारी कुटुंबातर्फे वडाळा बस आगार येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.