BEST Employees Strike : बेस्ट संपातील कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत घर खाली करण्याची नोटीस
BEST bus (Photo Credits: PTI)

BEST Employees Strike : विविध प्रलंबित मागण्यासांठी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. तर आज (9 जानेवारी) बेस्ट कर्माचाऱ्यांचा संपाचा दुसरा दिवस आहे. परंतु कर्माचाऱ्यांच्या मागण्यांवर बेस्ट प्रशासनाने संपावर गेल्यास मेस्माअंतर्गत कारवाई होणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मेस्माअंतर्गत संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा धाडल्या असून घर खाली करा असे सांगण्यात आले आहे.

बेस्ट कर्माचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. परंतु एकीकडे महापालिका आणि प्रशासनाने आश्वासन देऊन ही बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. परंतु आता धडक घर खाली करण्याच्या नोटिसा पाठवल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आपण कामावर गैरहजर राहिलात. तुम्ही पुकारलेला संप बेकायदेशीर आहे. त्यामुळे बेस्ट वसाहतीतील घर खाली करा असे नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेले आहे. (हेही वाचा- BEST Strike In Mumbai: 'बेस्ट बस बंद'च्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 40 जादा गाड्या रस्त्यांवर , मेट्रो, लोकलमध्ये गर्दी)

वेतनवाढ, वेतननिश्चिती आणि बेस्ट अर्थसंकल्पाचे महापालिका 'अ' अर्थसंकल्पात विलिनीकरण यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बंदची हाक पुकारली आहे. त्यामुळे तब्बल 25 लाख प्रवाशांना बेस्ट संपाचा फटका बसला आहे.