स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय लघु, सुक्ष्म उद्योग मंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्यानंतर नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, महाड न्यायालयाने नारायण राणे यांना सशर्त जामीन दिला होता. तसेच 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर या दोन तारखांना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नारायण राणे आज अलिबाग पोलिसांसमोर हजर झाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे जाबाब नोंदवण्यासाठी आज अलिबाग पोलिसांसमोर हजर राहणार असल्याची बातमी प्रसारमाध्यमांत झळकत होती. मात्र, अलिबाग पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी येथे आलो होते. मी कुठलाही जबाब यावेळी नोंदवला नाही. पोलिसांनी यावेळी चांगले सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra ZP Election 2021: राज्यातील 5 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात विधान केल्यानंतर शिवसैनिक संतापले होते. राज्यातील विविध पोलिसांत तक्रार आणि गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी कारवाई करत राणे यांना अटक केली होती. त्यानंतर त्याच दिवशी रात्री उशीरा महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. तसेच 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर या दोन तारखांना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजारपणामुळे नारायण राणे 30 ऑगस्टला अलिबागला हजर राहू शकले नव्हते.