Aaditya Thackeray (Photo Credits: Facebook)

आज राज्यात आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) उत्सव साजरा होत आहे. जरी या उत्सवाला कोरोना विषाणूचे गालबोट लागले असले, तरी नियमांचे पालन करून परंपरेनुसार होत असलेल्या गोष्टी पार पडत आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सपत्नीक महापूजा (Pandharpur Vitthal Rukmini Mahapuja). आषाढी एकादशीचे औचित्य साधून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही (Aditya Thackeray) उपस्थित होते. पण ही विठ्ठलाची महापूजा सुरू असताना, आदित्य ठाकरे यांना काही काळासाठी अस्वस्थ वाटू लागले व त्यानंतर ते काही काळ मंदिराबाहेरही आले होते.

ही बातमी समजताच आदित्य ठाकरे यांच्या तब्येतीबद्दल विचारणा होत होती. त्यांना अनेकांनी फोन-मेसेज करून तब्येतीची चौकशी केली होती. आता याबाबत आदित्य ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, ‘सकाळपासून मला तब्येतीबद्दल विचारणा करणारे अनेक मेसेजेस आले आहेत. तुम्ही मनापासून शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. आज सकाळी आषाढी एकादशीची पूजा झाल्यानंतर, डिहायड्रेशनमुळे मला अस्वस्थता जाणवली होती. यासाठी मला मंदिराबाहेर यावे लागले. त्यानंतर रिहायड्रेट झाल्यावर पुन्हा 5--7 मिनिटांत मी पूजेमध्ये सामील झालो.’ (हेही वाचा: विठूराया आम्हाला चमत्कार दाखव, तोंडाला पट्टी बांधून जीवन कसं जगायचं?, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विठ्ठलाला साकडे)

आदित्य ठाकरे ट्वीट-

तर अशाप्रकारे आदित्य ठाकरे यांना जाणवलेली अस्वस्थता ही किरकोळ असून, त्याबाबत काळजी करण्यासारखे काही नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, पूजा सुरू असताना अचानक आदित्य ठाकरे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते मंदिरातून बाहेर पडले व आपल्या गाडीत जाऊन बसले. त्यानंतर  सुरक्षारक्षकांकडून त्यांना पाणी देण्यात आले. गाडीमध्ये काही काळ बसल्यानंतर ते पुन्हा मंदिरात आले. आता आदित्य ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती मिळत आहे.