Rahul Gandhi, Aditya Thackeray | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेचा जा 65 वा दिवस आहे. शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेदरम्यान ते काही काळ राहुल गांधी यांच्याशी संवाद साधतील आणि पदयात्रेतही सहभागी होतील, असे समजते.

भारत जोडो यात्रा शुक्रवारी नांदेड जिल्ह्यात पाचव्या दिवशीही सुरू राहिली. आता ती हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करत आहे. हिंगोली जिल्ह्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यात भाग घेणार आहेत. आदित्य ठाकरे हे राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्यासमवेत दुपारी चारच्या सुमारास पदयात्रेत सामील होणार आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. (हेही वाचा, 'Daro Mat', Rahul Gandhi's video: 'डरो मत', राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील व्हिडिओ व्हायरल)

तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली यात्रा शुक्रवारी 65व्या दिवसात दाखल झाली. शेजारच्या तेलंगणातून ते महाराष्ट्रातील नांदेडमधील देगलूर येथे 7 नोव्हेंबरला रात्री पोहोचले होते आणि पाच दिवसांपासून जिल्ह्यात होते.नांदेडच्या अर्धापूर येथील पिंपळगाव महादेव येथील विठ्ठलराव देशमुख कार्यालयात यात्रेचा रात्रीचा मुक्काम होता. दाभड येथून नांदेड-हिंगोली रोडवर अर्धापूर येथे शुक्रवारी सकाळी पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली. दिवसाच्या उत्तरार्धात ही यात्रा चोरंबा फाटा येथून पुन्हा सुरू होऊन रात्री हिंगोली येथे पोहोचेल. सकाळी सहाच्या सुमारास यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर रस्त्यावरच राहूल गांधीजींचे स्वागत करण्यात आले. काँग्रेस नेत्याने वाटेत स्थानिक रहिवाशांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

दरम्यान, महाराष्ट्रात नांदेड येथील एके ठिकाणी बोलतानाचा राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते तरुणांना अतिशय महत्त्वाचा संदेश देताना दिसत आहेत. सशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे, अनेकांनी त्याला लाईक करुन प्रतिक्रियाही दिली आहे. भारत जोडो यात्रेला जसा पाठिंबा मिळत आहे त्याच प्रमाणे सोशल मीडियावरही राहुल गांधी यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो आहे.