युवासेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे तरुण आणि सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) - शिवसेना (Shiv Sena) युती 288 जागांपैकी प्रत्येकी 145 जागांवर लढवेल. विधानसभा निवडणुकीनंतर मुंख्यमंत्री पद शिवसेनेला मिळाले तर त्या पदावर युवानेते आदित्य ठाकरे हे असावेत अशी पक्षासह जनभावना असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या (गुरुवार, 17 जुलै 2019) जनआशिर्वाद यात्रेसाठी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. या पत्रकार परिषदेत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. ही यात्रा पाचोरा येथून सुरु होणार आहे.
या वेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र हा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे नेहमीच उभा रहिला आहे. त्यामुळेच जनआशिर्वाद यात्रेची सुरुवात ही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून करण्यात येत आहे. पक्षबांधणी आणि आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी तसेच लोकसंपर्क या दृष्टीकोनातून या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, दोन्ही पक्ष समान जागांवर लढतील. तसेच, मुख्यमंत्रीपदही समसमानच राहणार असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा, 15 दिवसात कर्जमाफीची प्रकरणं पूर्ण करा; उद्धव ठाकरे यांचा पीक विमा कंपन्या आणि बॅंकांना इशारा)
दरम्यान, शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आले तर त्या पदावर आदित्य ठाकरे हेच असावेत अशी पक्षासह जनभावना असल्याचेही संजय राऊत यांनी या वेळी सांगितले. जागावटपाच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले की, युतीच्या जागावाटपाची बोलणी ही अंतिम टप्प्यात आहेत. दरम्यान, या वेळी संजय राऊत यांनी जळगावच्या जागेवर शिवसेनेकडून दावा केले जाण्याचे संकेत अप्रत्यक्षपणे दिले. हे संकेत देताना ते म्हणाले, मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांचा संघर्ष पक्षाला माहीत आहे. मुक्ताईनगरच्या जागेबाबत देखील चर्चा केली जाईल.