Hate Speech Case: गुजरात एटीएसची कारवाई; भडकाऊ भाषण करणारे मौलाना Mufti Salman Azhari ला मुंबईत अटक, Watch Video
Maulana Mufti Salman Azhari (PC - X/ANI)

Hate Speech Case: जुनागडमध्ये भडकाऊ भाषण देणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अझरी (Mufti Salman Azhari) ला गुजरात एटीएसने (Gujarat ATS) मुंबईत (Mumbai) अटक केली आहे. इस्लामिक धर्मोपदेशक अझहरी यांच्यावर आपल्या वक्तव्याद्वारे द्वेष पसरवण्याचा आणि लोकांच्या भावना भडकावल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एटीएस पथक त्याचा शोध घेत होते. दुसरीकडे, अटकेनंतर मौलानाचे हजारो समर्थक रस्त्यावर आले. त्यांनी घाटकोपर पोलिस ठाण्याला घेराव घालून तात्काळ सुटकेची मागणी केली.

गुजरातमधील जुनागडमध्ये दिले होते भडकाऊ भाषण -

इस्लामिक धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अजहरी यांनी 31 जानेवारीला गुजरातमधील जुनागडमध्ये भाषण दिल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये द्वेषपूर्ण विधाने करण्यात आली होती. त्याच्या भडकाऊ भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम 153 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याच दिवशी कारवाई करत मौलानाच्या जवळच्या दोन जणांना अटक केली. तेव्हापासून मौलानाचा शोध सुरू होता. रविवारी संध्याकाळी गुजरात एटीएसने मुंबई पोलिसांच्या मदतीने अझहरीला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. (हेही वाचा -Indore Crime: कोचिंग क्लासमध्ये 10 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, आरोपी फरार)

पहा व्हिडिओ -

मौलानाच्या अटकेचे वृत्त समजताच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. घाटकोपर पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव जमला. काही वेळानंतर मौलानानेच पोलीस ठाण्यातून समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, 'ना मी गुन्हेगार आहे, ना मला इथे गुन्हा करण्यासाठी आणण्यात आले आहे. पोलीस काही महत्त्वाचा तपास करत आहेत. माझाही त्यांना पाठिंबा आहे. जर माझ्या नशीबात असेल तर मी कोणत्याही प्रकारच्या कारवाईसाठी तयार आहे.

सलमान अझरीचे वकील वाहिद शेख यांनी सांगितले की, सकाळी सिव्हिल ड्रेसमध्ये 35-40 पोलिस त्याच्या घरात घुसले. आम्ही त्यांना त्यांच्या उद्देशाबद्दल विचारले, परंतु त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. सकाळपर्यंत मौलानाचे समर्थक पोलिस ठाण्यात जमा झाले होते. कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.