Pune Bomb Blast Case: मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) 2012 मधील पुण्यातील जंगली महाराज रोड (Jagali Maharaj Road) परिसरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला आहे. आरोपी असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदारला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. असलम शब्बीर शेख याला 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. मुनीब इक्बाल मेमन, असद खान, इम्रान खान, सय्यद फिरोज, इरफान मुस्तफा लांडगे, फारुख बागवान, काशिफ बियाबानी आणि असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार, अशी या आरोपींची नावे आहेत.
पुणे शहरात 1 डिसेंबर 2012 रोजी संध्याकाळी 7 वाजता डेक्कन जिमखाना, बाल गंधर्व रंग मंदिर आणि इतर लगतच्या परिसरात बॉम्ब ठेवण्यात आले होते. यातील पाच बॉम्ब काही मिनिटांच्या अंतराने फुटले होते तर एक बॉम्ब फुटला नाही. हे बॉम्ब सायकलच्या कॅरिअर-बास्केटमध्ये ठेवण्यात आले होते. (हेही वाचा - Naam Ghum Jayega: 2010 च्या पुणे बॉम्ब स्फोटावरून प्रेरित वेब सिरीजमध्ये दिसणार Barkha Bisht; होणार ULLU App वर प्रदर्शित)
पुण्यातील विविध ठिकाणी झालेल्या पाच बॉम्बस्फोटानंतर, सुरुवातीला डेक्कन पोलिस स्टेशन, पुणे येथे अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपास मुंबई एटीएसकडे वर्ग करण्यात आला. बॉम्बस्फोटप्रकरणी नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपी अद्याप फरार आहेत. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी तसेच नुकसान किंवा मालमत्तेचा नाश करण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोटांची योजना आखली होती.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, इंडियन मुजाहिदीन या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा कथित सदस्य क्वातिल सिद्दिकीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बॉम्बस्फोटांची योजना आखण्यात आली होती. पुण्यातील दगडू शेठ गणपती मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी सिद्दीकीला अटक करण्यात आली होती. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात सिद्दीकीला ठेवण्यात आले होते, तिथेच तुरुंगातच त्याची दोन जणांनी हत्या केली होती.