राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या वाहनाला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहनाच्या पुढील चाक फुटल्याने  हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुंबईहून परभणीला आढावा बैठकीसाठी सरकारी वाहनातून जात असताना अहमदनगरमध्ये (Ahmadnagar) सकाळी साडेदहाच्या सुमारास केडगाव चौकात बायपासवर त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संबंधित वाहनांमध्ये नवाब मलिक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या ठिकाणी एस्कॉर्ट कार बोलवण्यात आली. या वाहनातून शासकीय वाहनाला विश्रामगृहात नेण्यात आले. त्यानंतर काही काळानंतर ते परभणीला रवाना झाल्याचे समजत आहे.

राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे परभणीचे पालकमंत्रीही आहेत. आज सकाळी ते मुंबई येथून परभणीला आढावा बैठकीला जाण्यासाठी सरकारी वाहनातून नगरमार्गे जात होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास केडगाव बायपास रोडवर त्यांचे वाहन आले होते. नील हॉटेल समोर लावलेल्या बॅरीकेटमधून एक कंटनेर जात होता. कंटनेर व बॅरीकेटमधून कार जेमतेम जाऊ शकेल एव्हढाच रस्ता होता. मंत्री नवाब मलिक यांच्या वाहनाचा वेग कमी करण्यासाठी या पॉईंटवर उभे असलेले शहर वाहतूक व कोतवालीचे पोलिसही सरसावले होते. मंत्री नवाब मलिक यांच्या चालकाने या जागेतून त्यांची वाहन पुढे नेले. त्याचवेळी चालकाच्या बाजूने टोकदार दगडाने त्यांच्या वाहनाचे पुढील चाक फुटले आणि त्यांच्या वाहनाला अपघात झाला. हे देखील वाचा- 'तुम्ही जेथे असाल तिथेच रहा, पुन्हा दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करू नका' शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या खासदारांना सूचना

मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांना अपघातात किरकोळ जखम झाली आहे. मात्र, वाहन अपघाताच्या दरम्यान नवाब मलिक यांच्या वाहनचालकाने ब्रेक दाबला असता तर, कदाचीत हा अपघात नवाब मलिक यांच्यासाठी मोठा ठरण्याची शक्यता होती. नवाब मलिक यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.