Amit Bhosale | (Photo Credits-Facebook)

प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक, एबीआयएल (ABIL Group) ग्रुपचे अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) काल (बुधवार, 10 फेब्रुवारी) छापे टाकले. त्यानंतर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अविनाश भोसले ( Avinash Bhosale) यांचा मुलगा अमित भोसले ( Amit Bhosale) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ईडीचे (ED ) पथक अमित यांना घेऊन पुणे येथून मुंबईला रवाना झाले. अमित भोसले यांना ईडीने मध्यरात्रीच मुंबईला आणले.

प्राप्त माहितीनुसार, बिल्डर अविनाश भोसले यांची विदेशी चलन प्रकरणात ईडीने चौकशी सुरु केली आहे. या चौकशी प्रकरणात ईडीने भोसले यांच्या 'अबिल हाऊस' कार्यालयावर छापे टाकले. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी भोसले यांच्या कार्यालयात बुधवारी दिवसभार तळ ठोकला. कागदपत्रे आणि आणि इतर काही गोष्टींची तपासणी करण्यात आली.

भोसले यांनी विदेशी खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचा ईडीला संशय आहे. याच प्रकरणात अधिकाऱ्यांनी अविनाश भोसले यांचा मुलगा अमित यांना ताब्यात घेतले आहे. छाप्यावेळी कार्यालयात सापडलेली कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी मुंबईला नेल्याचे समजते. दरम्यान, ईडीने अविनाश भोसले यांना नोव्हेंबर महिन्यातच चौकशीसाठी बोलवले होते. या वेळी त्यांची तब्बल 10 तास चौकशी झाली होती.

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे बांधकाम व्यवसायातिल मोठे प्रस्थ आहे. ते पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. अनेक राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. ते भारती विद्यापीठाचे संस्थापक दिवंगत पतंगराव कदम यांचे व्याही आहेत. भोसले यांची कन्या स्वप्नाली पतंगराव कदम यांचे चिरंजीव काँग्रेस नेते विश्वजित भोसले यांच्याशी विवाह केला आहे. भोसले हे कोट्यवधींची उलाढाल असलेल्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत.