Aarey Protest: आरे वृक्षतोडी विरोधात आंदोलन करणाऱ्या 29 जणांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात; कलम 144 लागू
Image For Representation, Aarey Forest (Photo Credits: Twitter/ ANI)

मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) काल, 4 ऑक्टोबर रोजी आरे हे जंगल नाही असे म्हणत मुंबई मेट्रो (MUmbai Metro) च्या कारशेडला हिरवा कंदील दिल्यानंतर सर्वत्र एकच गदारोळ सुरु आहे. अशातच काल रात्री आरे (Aarey) मधील शेकडो झाडांची कत्तल केल्यावर अनेक पर्यावरणस्नेही मंडळींनी सोशल मीडिया पासून ते थेट आरे परिसरात जाऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून आरे परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे, ज्यानुसार या ठिकाणी एकाच वेळी चार हुन अधिक माणसे जमा होऊ शकत नाहीत, मात्र या बंदीचे उल्लंघन करून अद्यापही अनेकजण वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी जमाव करत आहेत, परिणामी मुंबई पोलिसांनी यातील 29 जणांना ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळपासून आरे परिसरात 100 ते 200 जणांनी एकत्र येऊन आंदोलने पुकारली होती. यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक प्रयत्न करता होते, मात्र यातील काही जणांनी पोलिसांशी देखील वाद घालायला सुरुवात केली काहींनी तर पोलिसांवर हात उचलल्याचे देखील समजत आहेत. अखेरीस नाईलाजाने पोलिसांनी यातील 29 जणांना अटक केली आहे.

ट्विट

वृक्षतोडीच्या निर्णयावर आंदोलन करण्यासाठी काही वेळापूर्वी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मेट्रो प्रोजेक्टच्या प्रशासनाच्या निर्णयानंतर राजकीय मंडळींसहित बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील आपली नारजी व्यक्त केली आहे.

दरम्यान आरे वृक्षतोड हा सद्य घडीचा ज्वलंत विषय ठरत आहे. आंदोलनांमुळे ही परिस्थिती चिघळत चालली आहे, परिणामी या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आरे कॉलनी परिसरात वाहनांनादेखील रोखण्यात आले आहे.