शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि महाराष्ट्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate), इनकम टॅक्स विभाग आणि सीबीआय (CBI) यांच्यावर खास करुन ईडीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) राजकीय प्रभाव आहे. त्या एनडीएचा (NDA) भाग असल्यासारखेच वर्तन करत आहे. त्यातूनच दबावाचे राजकारण सुरु आहे. विरोधातील नेत्यांना पक्ष बदलण्यासाठी आणि त्यांना भाजप किंवा महायुतीचा भाग होण्यासाठी दबाव टाकला जातो आहे, असा आरोप आदित्य यांनी केला आहे. त्यांनीदावा केला की, केंद्रीय तपास यंत्रणा युवासेनेचे सूरज चव्हाण आणि किशोरी पेडणेकर यांसारख्या शिवसेना नेत्यांवर निष्ठा बदलण्यासाठी दबाव आणत होती. पक्षाचे दुसरे नेते राजन साळवी यांनाही अशाच जबरदस्तीच्या डावपेचांचा सामना करावा लागला, असे त्यांनी ठासून सांगितले.
ईडीवर आरोप:
आदित्य ठाकरे यांनी आज (19 जानेवारी) प्रसारमाध्यमांशी बोलताना अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र टीका केली. पाठिमागील काही काळापासून होत असलेल्या ईडीच्या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होत्या आणि आहेत. विशेषत: पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करणे आणि त्यांच्या राजकीय संबंधांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे. पक्ष कमकुवत करण्यासाठी जाणूनबुजून डावपेच म्हणून काम करणे. सरकारच्या राजकीय आदेशानुसार काम करणे, असले प्रकार ईडीद्वारे केले जात असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, ED Summons Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स, उद्धव ठाकरे गटाला दुसरा धक्का)
मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटला झालेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह:
ठाकरे यांनी "मॅग्नेटिक महाराष्ट्र" उपक्रमाच्या प्रामाणिकपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आश्वासने देऊनही प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून तो पुढे ढकलल्याबद्दल चिंता व्यक्त केली. विद्यमान भाजपा-शिवसेना युती सरकारने गुजरातने "व्हायब्रंट गुजरात" शिखर परिषद आयोजित करेपर्यंत शिखर परिषद जाणूनबुजून पुढे ढकलली, असा आरोप त्यांनी केला. (हेही वाचा, Rajan Salvi यांच्या रत्नागिरीच्या घरी पुन्हा ACB कडून छापेमारी; रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
ठाकरेंची भक्कम भूमिका
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, आदित्य ठाकरे यांनी शिवसेना (UBT) नेत्यांना जोरदार पाठिंबा दर्शविला. काहीही झाले तरी आपण कोणत्याही दबावाला घाबरणार नाही. जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. सूरज चव्हाण यांना अन्यायकारक पद्धतीने अटक करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर, राजन साळवी, रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांवरही दबावाचे राजकारण केले जात आहे. साळवी यांच्यावर तर पक्ष सोडण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात आहे, असे सांगतानाच या सर्वांचे धाडस आणि पक्षाशी असलेल्या बांधिलकीबद्दल कौतुक केले. (हेही वाचा, ED Summons MLA Rohit Pawar: रोहित पवार यांना ईडीचे समन्स, 24 जानेवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश)
व्हिडिओ
#WATCH | Shiv Sena (UBT) MLA Aaditya Thackeray says, " ED, I-T and CBI are part of NDA...the judgement of the Maharashtra Assembly Speaker has exposed the conspiracy of BJP so they (ED) have started taking action. Suraj Chavan has been arrested, pressure is being put on leaders… pic.twitter.com/olgs7FmDMX
— ANI (@ANI) January 19, 2024
दरम्यान, ईडीची कारवाई हा केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. आजच ईडीने आमदार रोहित पवार, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, त्याच राज्याच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये नोटीस पाठवली आहे.