Accident (PC - File Photo)

Pune Accident: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर (Mumbai-Bengaluru Highway) वारजे माळवाडीजवळील पेट्रोल पंपासमोर पहाटे 5.30 वाजता टेम्पोच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला. ही तरुणी तलाठ्याची परीक्षा (Talathi Exam 2024) देण्यासाठी निघाली होती. तरुणी आणि तिचे वडील, भाऊ एकाच दुचाकीवरून जात होते. तरुणीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. या तिघांच्या मागे तरुणी बसली होती. दुचाकी खड्ड्यात आदळल्याने तरुणी रस्त्याच्या उजव्या बाजूला पडली, त्यानंतर समोरून येणाऱ्या टेम्पोने युवतीला जोरदार धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा -Pune Mercedes Car Accident: पुण्यात कार अपघातांची मालिका सुरूच; आता सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाशी संबंधित मर्सिडीजने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू (Video))

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर अनेक अपघातांच्या घटनांमुळे देशपातळीवर चर्चेत आले आहे. पुण्यातील येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकात एक अपघात झाला. आलिशान मर्सिडीज बेंज गाडीखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी मर्सिडीज बेंजच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, केदार मोहन चव्हाण (वय 41) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर मर्सिडीज बेंजचा चालक नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर पडले. यावेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्यांच्या अंगावर गेली. चव्हाण यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.