Wai: परसणी घाटात 400 फूट खोल दरीत कोसळलेली गाडी झाडाला अडकली, थोडक्यात बचावला तिघांचा जीव
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

400 फूट खोल दरीत कोसळलेली गाडी झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. वाईहून पाचगणीला जात असताना पसरणी घाटात ही घटना घडली आहे. सुदैवाने कोणतीही जीविहानी झाली आहे. या कारमधील तिघजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. मुसळधार पाऊस आणि घाटातील धुक्यांमुळे वाहन चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने कार रस्त्यावरील संरक्षक कड्यावरून दरीच्या दिशेने घुसली होती. परंतु, कार काही अंतरावर जाऊन एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी तत्काळ पसरणी घाटात धाव घेतली. तसेच या अपघाताची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी आलेले कुलीन ठक्कर आणि त्यांचे कुटुंबीय हे काही कामानिमित्त वाईला गेले होते. तसेच त्यांचे काम आटोपल्यानंतर ते पुन्हा पाचगणीला निघाले. परंतु, परसणी घाटात आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यावरून दरीच्या दिशेने घुसली. सुदैवाने, काही फूट अंतरावर असलेल्या झाडात ती अडकल्यामुळे तिघांचा जीव वाचला आहे. या कारमधून एक पुरुष आणि दोन महिला प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Barge MV Mangalam जहाजावरील 16 कर्मचाऱ्यांची ICG 02 Chetak Helicopters च्या माध्यमातून सुटका

वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली. या अपघातात कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच कारमधील सर्वांचे प्राण वाचले आहे. कार 400 फूट दरीत कोसळली असते तर, मोठी दुर्घटना घडली असते. या परिसरात यापूर्वीही कित्येक अपघात घडले असून अनेकांच्या मृत्युची नोंद झाली आहे. यामुळे प्रवाशांनी सावकाश आणि सावधानीने वाहन चालवणे गरजेचे आहे.