कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घेतली पाहिजे, यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती माहिती पुरवली जात आहे. यातच कोरोना आलाय, दारात थुंकू नका, असे म्हटल्याने एका तरूणाला जमावाने बेदम मारहाण केली आहे. ही घटना पिंपरी-चिंडवड (Pimpri Chidwad) शहरातील वाकडमधील काळाखडक झोपडपट्टीत घडली. याप्रकरणी चौघांविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणू हे संपूर्ण देशावर आलेले संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.
सचिन भगवान कांबळे, असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता सुमारास फिर्यादी सचिन कांबळे त्यांच्या कुटुंबासमवेत आपल्या घरात बसले होते. दरम्यान, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विठ्ठल शिंदे हे सचिन कांबळे यांच्या दारात थुंकले. त्यावेळी कांबळेने आरोपी विठ्ठल शिंदेला रस्त्यात थुंकू नका, कोरोना आला आहे, असे म्हणाले. याचा राग आल्याने विठ्ठल शिंदे यांनी त्याच्या नातेवाईकाला बोलावून घेतेले. ते सर्वजण कांबळे याच्या घरात शिरले आणि त्यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यामुळे सचिन कांबळे यांनी विठ्ठल यांच्यासह बाळकृष्ण सुभाष शिंदे, जय बाळकृष्ण शिंदे आणि राजाराम खंडागळे यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे देखील वाचा- मुंबई: तबलीगी जमातीच्या 150 जणांविरोधात Quarantine च्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिस स्थानकात FIR दाखल
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी ठोस पावले उचचली जात आहेत. सोमवारी मुंबई येथील सांताक्रुझ परिसरात मणिपूर येथील एका महिलेवर थुंकल्याप्रकरणी एका दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.