A letter written with blood to Ajit Pawar: राजकिय भुंकपांमुळे राज्यात खळबळ उडाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले आहे. राजकिय भुकंपाचे छाप आता सर्व सामान्य जनतेवरही पाहायला मिळत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेल्या नाईक घराण्याविषयी निष्ठा, विश्वास आणि प्रेम असणारे अनेक समर्थक आजही पाहायला मिळतात. वाशिम जिह्यातील पुसद तालुक्याती शेंदोना या गावातील युवकाने दाखवून दिले. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यभरात सर्वत्रच चर्चा रंगाली आहे.
शेंदोणा गावातील निशांत राठोड या युवकाने स्वतःच्या रक्ताने आमदार इंद्रनील नाईक यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून राज्याच्या विविध विभागातून तीसपेक्षा अधिक आमदारांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांना साथ दिली आहे.
अजित पवारांना साथ देणाऱ्यांमध्ये राज्याच्या राजकारणामधील मातब्बर असलेल्या नाईक घराण्यातील पुसद मतदार संघाचे आमदार इंद्रनील मनोहर नाईक यांचासुद्धा समावेश आहे. आमदार नाईक यांचे मोठे वडील माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक व माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी राज्याच्या विकासामध्ये आपला मोलाचा वाटा उचललेला असल्याने नाईक घराण्याच्या चौथ्या पिढीला मंत्री मंडळामध्ये इंद्रनील नाईकांच्या रूपाने समाविष्ट करून घेण्याची आग्रही मागणी रक्ताद्वारे पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निशांत राठोड यांनी केल्याने शेंदोनाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये हा विषय कुतूहलाने चर्चिल्या जात आहे.