Scorpion Stings Passenger in Air India flight: नागपूरहून मुंबईला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात (Nagpur-Mumbai Air India Flight) अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानात बसलेल्या महिला प्रवाशाला विंचवाने (Scorpion) चावा घेतला. एअर इंडियाने 23 एप्रिल रोजी घडलेल्या घटनेची पुष्टी केली असून महिला प्रवाशावर उपचार करण्यात आले असून ती आता धोक्याबाहेर आहे.
विमानात जिवंत पक्षी आणि उंदीर सापडल्याच्या घटना घडत असताना, एखाद्या प्रवाशाला विंचूने दंश केल्याची ही दुर्मिळ घटना आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 23 एप्रिल 2023 रोजी फ्लाइट AI 630 मध्ये एका प्रवाशाला विंचवाने डंख मारल्याची अत्यंत दुर्मिळ आणि दुर्दैवी घटना घडली. (हेही वाचा - Online Game Suicide: ऑनलाईन गेम खेळताना गमावले पैसै, हर्सूल तलावात आत्महत्या; अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचे धक्कादायक पाऊल)
विमान उतरताच महिला प्रवाशावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानाचं लँडिंग होताच विमानतळावर डॉक्टर उपस्थित होते. या महिलेवर प्राथमिक उपचार करून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आमचे अधिकारी प्रवाशासोबत रुग्णालयात गेले आणि डिस्चार्ज होईपर्यंत प्रवाशाला सर्व प्रकारची मदत केली, असंही एआय प्रवक्त्याने सांगितलं आहे.
घटनेची माहिती मिळताच एअर इंडियाच्या अभियांत्रिकी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. आमच्या टीमने प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमानाची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर विंचू सापडला. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आणि गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत, असं एअर इंडियाने म्हटलं आहे.