Thane: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने बालमजुराचा मृत्यू, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

बालकामगार प्रतिबंध कायदा 1986 अंतर्गत 14 वर्षाखालील मुलाला कामाला ठेवणे कायद्याने गुन्हा असताना ठाणे येथील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ठाण्याच्या (Thane) भिंवडी (Bhiwandi) बस्ती येथील पोगाव येथे एका नवनिर्माण इमारतीचे काम सुरु आहे. या ठिकाणी काम करत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी बस्ती येथील पोगाव येथे नवनिर्माण इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीच्या बांधकामात जवाहर तालुक्यातील काही मुलांसह जवळपास 12 लोक काम करत आहेत. दरम्यान, 10 जून रोजी या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाच्या कुटुंबियांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. हे देखील वाचा- Lightning Kills Boy in Palghar: मोबाईल नेटवर्क शोधण्यासाठी झाडावर चढले, तेवढ्यात वीज कोसळली; एक ठार, तिघे जखमी; पालघर जिल्ह्यातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 आणि आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, बंधू कामगार कामगार यंत्रणा (निर्मूलन) अधिनियम आणि बाल न्याय कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.