Lightning Kills Boy in Palghar: मोबाईल नेटवर्क शोधण्यासाठी झाडावर चढले, तेवढ्यात वीज कोसळली; एक ठार, तिघे जखमी; पालघर जिल्ह्यातील घटना
Lightning | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

झाडावर चढून मोबाईल नेटवर्क (Mobile Network ) शोधणे चार मुलांच्या अंगाशी आले. यातील एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. पालघर (Palghar) जिल्ह्यातील डहाणू (Dahanu) तालुक्यातील ओसरविरा गावात मानकरपाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडला. प्राप्त माहितीनुसार ही घटना 28 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. ही मुले मोबाईल नेटवर्क शोधण्यासाठी झाडावर चढली होती. तेव्हा आकाशातून वीज कोसळली आणि ही घटना घडली. गावात मोबाईलला रेंज येत नाही. त्यामुळे मोबाईलची रेंज शोधण्यासाठी ही मुले पाड्यापासून साधारण एक ते दीड किलोमीटर दूर अंतरावर गेली होती, असे समजते.

घटनेबाबत माहिती अशी की, सोमवारी (28 जून) सायंकाळच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील डहाणू तालूक्यात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. हलक्या प्रमाणात वाराही वाहू लागला. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी स्थिती होती. अशाच वेळी या तालुक्यातील ओसरविरा गावाताली मानकरपाडा येथील काही मुले मोबाईल नेटवर्क शोधत होती. हे नेटवर्क शोधता शोधता ही मुले उंबराच्या झाडावर चढली. नेमकी याच वेळी आकाशातून वीज कोसळली. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला. तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले. (हेही वाचा, YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेट असूनही Slow Play होतात, करा 'हे' सोप्पे काम)

रविन बच्चू कोरडा (वय 17 वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.तो इयत्ता नववीमदध्ये शिकत होता. तर, चेतन मोहन कोरडा (वय 11 वर्षे), दीपेश संदीप कोरडा (वय 11 वर्षे) आणि मेहुल अनिल मानकर (वय 12 वर्षे) अशी जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत. हे सर्वजण सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गात शिकत होते. रविन कोरडा हा जागीच ठार झाला. मोहन कोरडा (वय 11 वर्षे), दीपेश संदीप कोरडा (वय 11 वर्षे) यांच्यावर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मेहुल मानकर याची स्थिती अधिक गंभीर असल्याने त्याच्यावर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.