Mumbai: मीरा-भाईंदर परिसरात अत्यंत लाजिरवाणा प्रकार घडला आहे. एका स्वयंघोषित धर्मगुरूने 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नया नगर पोलिसांनी या परिसरात सुरू असलेल्या हॉटेलवर धाड टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला. यासंदर्भात टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हा धर्मगुरू मूळचा गुजरातचा असून तो सध्या मीरा-भाईंदरमध्ये राहतो. मीरारोडमधील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकली. यावेळी हॉटेलमध्ये तीन मुली सापडल्या. यात एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचादेखील समावेश होता. पोलिसांनी या मुलीची कसून चौकशी केली. त्यानंतर या मुलीने आपल्यावर मीरा-भाईंदर परिसरातील एक धर्मगुरू लैंगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले. (वाचा - Mumbai: लोकल ट्रेनमध्ये प्रवाश्याला ठार मारल्याप्रकरणी 23 वर्षीय व्यक्तीला अटक; रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई)
नया नगर पोलिसांनी या मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे मीरा-भाईंदर परिसरातील 60 वर्षीय धर्मगुरुला अटक केली. या धर्मगुरूवर नया नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी रायगडमध्ये खालापूर तालुक्यात आदिवासी कातकरी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. पीडित महिला एका विटभट्टीवर कामगार होती. या महिलेच्या हत्येनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हस्तक्षेपानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.