
Maharashtra SSC Result 2023: शुक्रवारी इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. यात अनेक विद्यार्थ्यांनी 90 हून अधिक गुण मिळवले. तर अनेक विद्यार्थी हे काठावर पास झाल्याचंही पाहायला मिळालं. पुण्यातील 43 वर्षीय कचरा वेचणाऱ्या महिलेने आणि तिचा 15 वर्षांच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलं. या माय-लेकरांनी एकत्र दहावीची परीक्षा (SSC Exam) दिली होती. या परीक्षेत दोघांनाही यश मिळालं आहे. मोनिका तेलंगे आणि तिचा मुलगा मंथन तेलंगे यांनी दहावीच्या परीक्षेसाठी एकत्र अभ्यास केला.
विशेष म्हणजे आईचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मंथनने शिक्षकाची भूमिका निभावली. त्यांनी मिळून 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) शुक्रवारी जाहीर केलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुण्यातील तेलंगे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. (हेही वाचा -Maharashtra SSC Result 2023: आश्चर्यकारक! पुण्यातील पठ्ठ्याची कमाल! दहावीच्या बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये मिळवले 35 गुण)
दहावीच्या परीक्षेत मोनिका 51.8% गुणांसह उत्तीर्ण झाली तर तिचा मुलगा 64% गुणांसह उत्तीर्ण झाला. हे कुटुंब हडपसर येथे स्थायिक झाले असून मोनिकाला एसएससी पूर्ण करायचे होते, जेणेकरून तिला विविध नोकऱ्यांसाठी अर्ज करता येईल.
तिने तिच्या मुलाचे अभ्यास साहित्य आणि शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापरून स्वतः अभ्यास केला. तसेच शाळेत नियमितपणे वर्गात जाणारा तिचा मुलगा घरी तिचा शिक्षक बनला. पुण्यातील एमएसबीएसएचएसईने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. यंदा राज्याची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.83% आहे.