पुणे (Pune) जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी सुरु आहे. त्यामुळे पाण्याची आवक कायम आहे. खडकवासलातून (Khadakwasla Dam) यंदाच्या मोसमात आजवर 9.08 टीएमसी इतके पाणी विसर्गाच्या माध्यमातून मुठा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे 'खडकवासला', 'पानशेत' आणि 'वरसगाव' पूर्ण क्षमतेने तर टेमघर धरण भरण्याच्या मार्गावर आहे.
सध्या पानशेत धरणामधून 1,980 आणि वरसगावमधून 4,441 क्युसेक वेगाने पाणी खडकवासल्यात येत असून मुठा पात्रात 9,416 क्युसेक वेगाने विसर्ग कायम आहे. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. (हेही वाचा - Wainganga River: भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या जलस्तरात वाढ; गोसेखुर्द धरणाचे एकूण 33 दरवाजे उघडले; पहा व्हिडिओ)
#Alert : 'खडकवासला'तून ९ हजार ४१६ क्युसेक वेगाने विसर्ग कायम !
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी सुरु असून यामुळे पाण्याची आवकही कायम आहे. यात पानशेतमधून १,९८० आणि वरसगावमधून ४,४४१ क्यु. वेगाने पाणी खडकवासल्यात येत असून मुठा पात्रात ९,४१६ क्यु. वेगाने विसर्ग कायम आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 30, 2020
खडकवासला साखळी धरण प्रकल्प पाणीसाठा
◆ खडकवासला : 1. 97 टीएमसी/ 100%
◆ पानशेत : 10.65 टीएमसी/100%
◆ वरसगाव : 12.82 टीएमसी/100%
◆ टेमघर : 3.38 टीएमसी/91.09%
याशिवाय पवना धरणातील पाणीसाठा 96 टक्क्यांपेक्षा जास्त झालेला असून आज सकाळी 9 वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे 3000 क्युसेस वेगाने नदीमध्ये विसर्ग सोडण्यात येणार आहे. विसर्गाचा वेग कमी असला तरी पावसाचा वेग वाढल्यावर विसर्गही वाढू शकेल, असं पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितलं आहे.