8 Years of Modi Government: मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण; NCP ने दिली भाजप सरकारच्या 8 अपयशांची यादी (See Video)
NCP VS BJP| (Photo Credits-file photo)

केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला (M odi Government) 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 26 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदींनी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गुरुवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. वाढती महागाई, बेरोजगारी, लोकशाहीची होणारी दडपशाही, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात आलेले अपयश, द्वेषाचे राजकारण, रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक पतन आणि सामाजिक बांधणीची झीज अशा भाजप सरकारच्या आठ अपयशांची देशाला वारंवार आठवण होते, असे राष्ट्रवादीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.

मोदींच्या या 8 वर्षांत देशाने खूप काही गमावले आहे, असे तपासे म्हणाले. तसेच आरएसएसच्या विचारसरणीने देशातील जातीय सलोखा बिघडवला आहे. विज्ञान आणि समतेवर धर्म आणि वंश राज्य करत आहेत, असा दावा तपासे यांनी केला. याबाबत पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तपासे म्हणतात की, ‘मोदी सरकारचे 8 वर्षांचे प्रशासन कि कुशासन? हे आता देशाच्या जनतेनेच ठरवायचे आहे. या 8 वर्षांत जनतेने खूप काही गमावले आहे. महागाई वाढली आहे, पेट्रोल-डीझेल, घरगुती एलपीजी परवडत नाही अशी परिस्थिती झाली आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याच्या वल्गना करणाऱ्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील नागरिकांनी आज 12.5 ते 13 कोटी नोकऱ्या गमावल्या आहेत. रुपयाची झालेली ऐतिहासिक घसरण पाहून देशवासियांना परदेशी जाणेही परवडणारे नाही. तसेच भारताचे आभूषण असलेला जातीय आणि धार्मिक सलोखा मोडून काढण्यातही मोदी सरकारला यश आलेले आहे.’ (हेही वाचा: OBC आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून निवडणुका घेण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार)

दरम्यान, मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप पक्षाला संघटित करून मोदी सरकारचे कर्तृत्व सांगण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांचा आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्णपणे अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने यावेळी नवा नारा दिला- ‘8 साल, 8 छल, मोदी सरकार विफल’.