मुंबईतील लालबागचा राजाचा (Lalbaugcha Raja) विसर्जन सोहळा अगदी धुमधडाक्यात आणि जल्लोषात पार पडला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी सहकार्य केले. सगळे साग्रसंगीत पार पडले खरे मात्र या सोहळ्याला गालबोट लागले ते चोरांच्या सुळसुळाटामुळे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, लालबागचा राजाच्या मिरवणुकीत भाविकांच्या बहुमूल्य वस्तू लंपास करणा-या 8 चोरट्यांना बेड्या ठोकल्या. या चोरांकडून नागरिकांच्या मोबाईल, पाकिटे, रोख रक्कम यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या.
मुंबईतील (Mumbai) 'लालबागचा राजा'ची विसर्जन मिरवणूक सकाळीच सुरू झाली. तब्बल २१ तासांनंतर ही मिरवणूक संपली. या दरम्यान, एका टोळीने भाविकांच्या अनेक मौल्यवान वस्तू, पाकिटे, रोख रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या. यानंतर कारवाई करत आठ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. गुन्हे शाखेच्या युनिटने गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या चारचाकी गाडीतून तुटलेल्या सोन्याच्या चेन, रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. या वस्तू 'लालबागचा राजा' विसर्जन मिरवणुकीत चोरण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्यांनी दिली. हेही वाचा- Lalbaugcha Raja Visarjan Sohala 2019: लालबागचा राजा 2019 ला भाविकांनी दिला 21 तासांच्या मिरवणूकीनंतर गिरगाव चौपाटीवर निरोप
यासंदर्भात काळाचौकी पोलीस स्थानकाला माहिती देण्यापूर्वीच त्याच्याकडे चोरीच्या तक्रारी आल्या होत्या, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. विसर्जनाच्या मिरवणुकीत चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
यंदा लालबागच्या राजा सार्वजनिक मंडळाचे 86 वे वर्ष होते. दहा दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये भाविकांनीदेखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. यामध्ये सामान्यांसोबत सेलिब्रिटींनीदेखील मोठी गर्दी केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून बच्चन, अंबानी कुटुंबीय, दीपिका पदूकोण यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. मागील दहा दिवसांत लालबागच्या राजासाठी एन पावसातही दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र होतं. आणि तितक्याच भक्तीभावाने गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.