सोलापूर महानगरपालिकेच्या (Solapur Mahapalika) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यात आला आहे. काल महापालिकेत त्याची घोषणा करण्यात आल्यानंतर कर्मचार्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर महानगर पालिकेतील कर्मचारी सातव्या वेतन लागू करण्यासाठी मागणी करत होते. यासाठी त्यांनी प्रसंगी निदर्शनं देखील केली होती.
मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांना ही गोड बातमी मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ देण्यासाठी पालिकेच्या तिजोरीवर 42 कोटींचा बोजा पडणार आहे.
महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन लागू करावा यासाठी कामगार कृती समितीचा 2016 पासून पाठपुरावा सुरू होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला होता. 1 जानेवारी 2021 पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, अशी कामगारांची मागणी होती. त्यानुसार राज्याच्या नगरविकास खात्याने 1 जानेवारी 2021 पासून वेतन अदा करण्याचे आदेश दिले आहेत.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, राज्य सरकारने नुकतीच राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनादेखील सातव्या वेतन आयोग लागू करत खुशखबर दिली आहे. यामध्ये सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला आणि दुसरा हप्ता फेब्रुवारी 2022 महिन्यात देण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्या संदर्भात एक पत्र शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे त्यामुळे राज्यातील शिक्षकांसाठीदेखील ही आनंदाची बातमी आहे.
यापूर्वी राज्य सरकारने मुंबई, ठाणे, पुणे, केडीएमसी मध्येही पालिका कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ दिली आहे.