International Yoga Day 2021:  20 जणांच्या छोट्या योगप्रेमी गटाने ऐतिहासिक आगा खान पॅलेस आणि कान्हेरी लेण्यांमध्ये साजरा केला  7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन
पुणे । Photo Credits: PIB Mumbai

आज 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे येथील ऐतिहासिक आगा खान पॅलेस आणि मुंबईतील कान्हेरी लेण्यांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ही स्थळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत (एएसआय) राष्ट्रीय महत्त्व असलेली संरक्षित स्मारके आहेत. ती एएसआय, मुंबई मंडळाच्या अखत्यारीत आहेत. या प्रसंगी, आगा खान पॅलेसमध्ये वीस सहभागींनी एएसआय मुंबई मंडळासह औरंगाबाद मंडळाचा अतिरिक्त प्रभार असलेले अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. मिलनकुमार चौले यांच्या उपस्थितीत योगासने केली. 45 मिनिटांच्या योग सत्रामध्ये सहभागी झालेल्यांमध्ये एएसआय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली. तसेच नागपूर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्रातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात पुण्यातील प्रवीण भट्ट आणि लेझीम समूहाने सादर केलेले लेझिम नृत्य यांचा समावेश होता. पुण्याच्या एकेकेआय मार्शल समूहाने ‘शिवकालीन युद्ध कला’ नावाची मार्शल आर्ट सादर केली.

त्याचप्रमाणे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थित कान्हेरी लेण्यांमध्ये एएसआय मुंबई मंडळाचे अधिकारी व इतरांच्या उपस्थितीत 20 जणांनी योगासने केली. त्यानंतर संगीत नाटक अकादमीतर्फे शास्त्रीय नर्तक शर्वरी जमेनिस यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वेरुळ लेणी (औरंगाबाद), नालंदा (बिहार), साबरमती आश्रम (गुजरात), हम्पी (कर्नाटक), लद्दाख शांती स्तूप (लेह), सांची स्तूप (विदिषा), शीश महल (पटियाला), राजीव लोचन मंदिर (छत्तीसगड), बोमदीला (अरुणाचल प्रदेश) यासह इतर ऐतिहासिक वारसा स्थळांवर संस्कृती मंत्रालयाने, योग आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.

यंदा स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी देशातील 75 ऐतिहासिक वारसा स्थळांवर हा योग कार्यक्रम आयोजित केला होता. तर सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेता प्रत्येक स्थळावर 20 जणांनाच सहभागी होण्याची मर्यादा घातली होती.