राजकीय खळबळ! भाजपचे 7 आमदार अजित पवार यांच्या संपर्कात? दर्शवली राजीनामा देण्याची तयारी
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

अनेक चर्चा, कुरघोड्या, आरोप प्रत्यारोप घडल्यानंतरही भाजप (BJP) महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी असमर्थ ठरला. शिवसेनेने (Shiv Sena) आपली भूमिका ठाम ठेवल्याने आता राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसची (Congress) साथ उद्धव ठाकरे यांना मिळाली आहे. सध्या उत्द्धाव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक चालू असुन, या पार्श्वभूमीवर भाजपसाठी अजून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे तब्बल 7 आमदार अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. ‘खोबरे तिकडे चांगभले’ या उक्ती प्रमाणे हे आमदार भाजप सोडून महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या नव्या युतीमध्ये सामील होऊ इच्छित आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या 7 आमदारांचा अजित पवार यांच्याशी संपर्क झाला आहे. गरज पडल्यास नव्या युतीला समर्थन देण्यासाठी हे आमदार भाजपचा राजीनामाही देण्यास तयार आहेत. अजित पवारांना फोन करणारे सातपैकी 2 आमदार सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. आमदारकी गेली तरी चालेल, आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर पुन्हा निवडून येऊ, असे या आमदारांनी अजित पवार यांना सांगितले आहे. जर का खरच असे झाले तर हा भाजपसाठी फार मोठा धक्का असणार आहे. सोबत अपक्ष आमदाराही नव्या युतीला समर्थन देतील असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह आघाडीतील दोन्ही पक्षांनी पुन्हा एकदा अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. (हेही वाचा: भाजप सत्ता स्थापनासाठी असमर्थ ठरल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून हालचालींना वेग, पक्षाची रणनिती लवकरच ठरवणार असल्याचा अशोक चव्हाण यांचा इशारा)

दरम्यान, गेल्या 15 दिवसांमध्ये युतीची समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद न देण्यावर भाजप ठाम होते, तर शिवसेनाही मागे हटायला तयार नव्हती. अशात आता राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ता स्थापन करणार असे चित्र दिसत आहे. या बाबतीतील घडामोडींना वेग आला असून, आज संध्याकाळी 4.30 नंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील.