Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आज कोरोना व्हायरसचे (Coronavirus) 6,875 रुग्ण व 219 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रामधील एकूण  कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,30,599 वर पोहोचली आहे. आज राज्यात 4,067 रुग्ण बरे झाले आहेत. यासह राज्यात आतापर्यंत 1,27,259 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये 93,652 सक्रीय रुग्ण असून, एकूण कोरोना बाधित मृतांचा आकडा 9,667 झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत माहिती दिली. सध्या महाराष्ट्रामध्ये मृत्यूदर हा 4.19 टक्के आहे.

आजपर्यंत घेतल्या गेलेल्या 12,22, 487 नमुन्यांपैकी 18.86 टक्के म्हणजे, 2,30, 599 नमुने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 6,49, 263 लोक घरीच क्वरंटाईन आहेत, तर 48,191 रुग्ण संस्थात्मक क्वरंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यामध्ये मुंबई, ठाणे व पुणे हे सर्वाधिक बाधित जिल्हे आहेत,

एएनआय ट्वीट -

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीएमसीच्या तसेच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेखीसाठी नेमलेल्या सनदी अधिकाऱ्यांकडून, कोरोना विषाणू उपाययोजनांचा आढावा घेतला. सुविधा सुधारल्या, आता रुग्ण सेवेवर लक्ष केंद्रित करा, उपलब्ध बेड्ससह रुग्णवाहिकांचे नियंत्रण आवश्यक, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. तसेच मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना विषाणू संसर्ग थांबविणे, सोबत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. (हेही वाचा: कोरोना व्हायरस औषध Remdesivir चा काळा बाजार; 30,000 ते 40,000 हजार प्रती कुपी दराने होत आहे विक्री- Report)

दरम्यान, मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण घटल्याचे दिसते. या परिसरात आज 9 रुग्ण सापडले आहेत. अशाप्रकारे या परिसरातील एकूण रुग्णसंख्या 2,347 इतकी झाली आहे.