धक्कादायक! कोरोना व्हायरस औषध Remdesivir चा काळा बाजार; 30,000 ते 40,000 हजार प्रती कुपी दराने होत आहे विक्री- Report
Remdesivir (Photo Credits: AFP)

कोरोना व्हायरस (Coronavirus) उपचारासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हीर (Remdesivir) औषधाची खरेदी करून, सरकारी आणि खाजगी रुग्णालयात हे औषध उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता या औषधाचा काळा बाजार होत असल्याचे समोर आले आहे. मार्केटमध्ये रेमडेसिव्हीरची कुपी तब्बल 40,000 रुपयांना विकली जात आहे, जिथे सरकार सध्या 4100 रुपयांमध्ये हे औषध पुरवत आहे. दुसरीकडे आतापर्यंत बीएमसीने (BMC) या औषधाच्या 15,000 बाटल्यांची ऑर्डर दिली असून, त्यापैकी 5,900 ची पहिली बॅच मिळाली आहे. मात्र आता रेमडेसिव्हीरचा काळा बाजार होत असल्याने सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशी कंपन्या आणि काही भारतीय उत्पादक मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (MMR) मध्ये दररोज जवळपास 50 लोकांना ही औषधे पुरवीत आहेत. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या म्हणण्यानुसार, फार्मास्युटिकल कंपन्या या फक्त रुग्णालयांनाच रेमडेसीव्हीर विकू शकतात. रूग्णालयातील फार्मेसीज हे औषध सुमारे 4500 रुपये प्रति पॉपवर विकत घेत आहेत आणि ते काळ्या बाजारात प्रति कुपी 30,000 ते 40,000 रुपयांना विकत आहेत. कोरोना व्हायरस रुग्ण असलेल्या कुटुंबाच्या गरजेचा आणि हताशीचा असा चुकीचा फायदा घेतला जात आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार रेस्टॉरंट्स आणि जिम; याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची राजेश टोपे यांची माहिती)

गेल्या महिन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केली होती की, राज्य सरकार बांगलादेशी फर्मकडून 10,000 रेमडेसिव्हीर खरेदी करेल. मंगळवारी डीसीजीआयने आपल्या अधिकाऱ्यांना रेमडेसिव्हीरची काळ्या बाजारात विक्री होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. अंमलबजावणी संस्थांना दिलेल्या पत्रात, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व्ही. जी. सोमानी म्हणाले की, 'काही व्यक्तींकडून Remdesivir चे ब्लॅक मार्केटिंग होत आहे. हे औषध चढ्या किंमतीमध्ये विकले जात आहे. या प्रकरणात केलेली कारवाई लवकरात लवकर या कार्यालयात कळवावी.'

दरम्यान, सिप्लाने बुधवारी Remdesivir ची जेनेरिक आवृत्ती 'Cipremi' सादर केली. पहिल्या महिन्यात 80,000 पेक्षा जास्त कुपी पुरवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. हेटरो लॅब लिमिटेडच्या आवृत्तीला कोविफर (Covifor) म्हटले जाते, त्याची किंमत प्रति कुपी 5,400 रुपये असते, तर मायलनच्या औषधाला डेस्ट्रम (Desrem) म्हटले जाते.