Maharashtra May Consider Reopening Restaurants & Gyms: महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार रेस्टॉरंट्स आणि जिम; याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची राजेश टोपे यांची माहिती
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर देशात मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) ला सुरुवात झाली होती. त्यानंतर 3 जून पासून महाराष्ट्रात या लॉक डाऊनच्या नियमांमध्ये ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत शिथिलता आणली गेली. राज्यात दुकाने उघडण्यास परवानगी दिली, तसेच 8 जुलैपासून कंटेनमेंट झोन बाहेरील हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊसला सुरु करण्यासगी परवानगी देण्यात आली आहे. आता राज्य सरकार रेस्टॉरंट्स (Restaurants) आणि व्यायामशाळा (Gym) पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी याबाबत माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, ‘महाराष्ट्रात हॉटेल्स पुन्हा सुरू झाली आहेत, त्याचप्रमाणे आम्ही आगामी काळात रेस्टॉरंट्स आणि व्यायामशाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करू व आम्ही याबद्दल सकारात्मक आहोत. सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले तर, या दोन्ही गोष्टी पुन्हा सुरू करण्यात काहीच हरकत नाही.’ याआधी महाराष्ट्र सरकारने 28 जून पासून जिम सुरु करण्याबाबत आदेश दिले होते, मात्र त्यानंतर त्यावर रोख लावली. (हेही वाचा: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले महत्त्वाचे नऊ निर्णय; शिवभोजन थाळी पुढचे 3 महिने 10 वरुन 5 रुपयांवर)

एएनआय ट्वीट-

गेले तीन महिने राज्यातील जिम बंद आहेत त्यामुळे अनेक जिम मालकांनी, ट्रेनर्सनी जुम सुरु करण्याची मागणी केली होती. आता राज्य सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज 6, 603 नव्या कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली आहे, तर 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2, 23, 724 वर पोहचली आहे. यापैकी 9,448 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1,23,192 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.