Online Fraud Case In Pune: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यातील एका 64 वर्षीय माजी सैनिकाने 'ऑनलाइन टास्क फ्रॉड'मध्ये आपली सर्व बचत, सेवानिवृत्ती लाभ असे एकत्रितपणे 1 कोटी रुपये गमावले. ही व्यक्ती पुणे शहरातील रहिवासी असून तो अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी ऑनलाइन कामाची संधी शोधत होता.
TOI च्या बातमीनुसार, ही ऑनलाइन फसवणूक 13 ते 26 फेब्रुवारी दरम्यान झाली होती, मात्र पीडित व्यक्तीने या आठवड्यात पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत त्याने सांगितले की, त्यांनी गेल्या वर्षी एक मेसेजिंग अॅप डाउनलोड केले होते, ज्यामुळे ग्रुप चॅटिंग करता येते. तिथे त्याला एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला, ज्यामध्ये त्याला सोप्या कामांसाठी खूप पैसे मिळत असल्याचं सांगण्यात आलं. (हेही वाचा - Online Fraud: अमरावती मध्ये व्यावसायिकाच्या 3 अकाऊंटमधून विना OTP, QR Code Scan करता 5 लाख 74 हजार उडाले)
वृद्धाने ही ऑफर स्विकारली आणि नंतर पेमेंट मिळवण्यासाठी व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर लाईक बटणावर क्लिक करायला सांगितलं. सुरुवातीला वृद्धाला काही पैसे आणि वेलकम बोनस मिळाला. सायबर पोलिसांच्या सीनियर इन्स्पेक्टर मीनल पाटील यांनी सांगितलं की, “त्यांना प्रीपेड टास्कसाठी 1,000 रुपये देण्यास सांगितले होते. त्यानंतर टास्क पूर्ण केल्यावर त्यांना मोठी रक्कम मिळाली. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना प्रीपेड कामांवर अधिक परतावा देण्याचे आश्वासन दिले. पीडित व्यक्तीने पैसे जमा केले आणि आपली सर्व बचत संपवली."
पोलिसांनी सांगितले की, पीडित व्यक्तीने 60 लाख रुपयांची बचत आणि सेवानिवृत्तीचे फायदे गमावले. तसेच त्याने आपल्या मुलाकडून घेतलेले 40 लाख रुपये गमावले. तपासानुसार, पीडित व्यक्तीने जमा केलेले पैसे पाच बँकांच्या 12 खात्यांमध्ये गेले. साधी ऑनलाइन कामे करून पैसे कमविण्याची संधी देणार्या अशा कोणत्याही मेसेज किंवा जाहिरातींमुळे दिशाभूल करू नका.
जेव्हा केव्हा तुम्हाला ऑफर मिळेल, तेव्हा ती नीट तपासा. तुमचे बँकिंग तपशील अनोळखी व्यक्तींसोबत कधीही ऑनलाइन शेअर करू नका. तुम्ही फसवणुकीला बळी पडल्याचा संशय असल्यास, तात्काळ अधिकार्यांना कळवा.