Online Fraud: अमरावती मध्ये व्यावसायिकाच्या 3 अकाऊंटमधून विना OTP, QR Code Scan करता 5 लाख 74 हजार उडाले
Fraud (Photo Credits: IANS) | Representational Image

आधी नोटाबंदी आणि नंतर कोविड संकट यामुळे अनेकांनी डिजिटल आर्थिक व्यवहारांना पसंती दिली. आता लहान सहान व्यवहार देखील UPI द्वारा करण्याची अनेकांना सवय लागली आहे पण यातूनच सायबर क्राईमचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेकांची यामध्ये आर्थिक फसवणूक देखील झाली आहे. अमरावती मध्येही असाच एका आर्थिक फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झालेल्या व्यक्तीने ना कुणासोबत ओटीपी शेअर केला ना क्यू कोड स्कॅन पण तरीही एका व्यावसायिकाने आपल्या 3 बॅंक अकाऊंटमधून 5 लाख 74 हजार गमावल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकमत च्या वृत्तानुसार, 23 नोव्हेंबरच्या या घटनेची अखेर 28 जानेवारी दिवशी दखल घेत त्यासंबंधीचा गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. 55 वर्षीय व्यावसायिकाची 3 बॅंकेमध्ये खाती आहेत. 23 नोव्हेंबर दिवशी सकाळी 6 वाजता उठल्यानंतर आपल्या तीन अकाऊंट मधून तब्बल 5 लाख 74 हजार गेल्याचे मेसेज त्यांनी पाहिले. दरम्यान अनोळखी अकाऊंटमध्ये हे व्यवहार झाले असून त्याबाबतचा कोणताही कॉल, ओटीपी किंवा कोड स्कॅनचा प्रकार झालेला नव्हता. पोलिसांकडे ही बाब नेल्यानंतर त्यांनी दोन महिन्याच्या चौकशीनंतर अखेर फसवणूकीचा गुन्हा नोंदवून घेतलेला आहे.

ऑनलाईन फसवणूक ही अनेकदा इतकी सहज केली जाते की त्यांचा थांगपत्ता देखील समोरच्या व्यक्तीला लागत नाही. व्यवहारांमध्ये पैसे देताना ओटीपी मागितला जातो पण स्वीकारणार्‍याला त्याची गरज नसते हे लक्षात ठेवा. अनेकदा युजर्सच्या अज्ञानाचा देखील चूकीच्यापद्धतीने गैरफायदा घेत त्याची फसवणूक होऊ शकते.

व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक होण्यापुर्वी त्यांना काही मॅसेज आले का, त्यांनी कुठल्या लिंकवर क्लिक केले का, याचा देखील आता तपास केला जाणार आहे.