Coronavirus In Mumbai: 635 नव्या COVID-19 रुग्णांसह मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 9758 वर
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 3 मे पर्यंत ठेवण्यात आलेला लॉकडाऊन आता 17 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोना संक्रमितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून कोरोनाशी लढण्यासाठी सर्व शासकीय तसेच वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. मुंबईत (Mumbai) आज कोरोनाचे 635 नवे रुग्ण आढळले असून मुंबईतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 9758 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात मुंबईत 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 387 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून सद्य स्थितीत 14,541 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी दिलासादायक गोष्ट म्हणजे आज राज्यात एकूण 350 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आतापर्यंत राज्यात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या रुग्णांना घरी सोडण्याची पहिलीच वेळ आहे. मुंबई (Mumbai) शहरात 228 तर, पुणे (Pune) शहरात 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकूण 2 हजार 465 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

सद्य स्थितीत भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 46,711 वर पोहोचली असून एकूण 1,583 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात 31,967 रुग्ण सध्या उपचार घेत असून 13,160 रुग्ण बरे झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच जगभरात आतापर्यंत तब्बल 2,50,000 पेक्षाही अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) मधील सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (सीएसएसई) ने जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.