
Kurla Shocker: मुंबई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कुर्ला (Kurla) परिसरात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) करण्यात आला. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी (Chunabhatti Police) दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही आरोपी मुलांनी अल्पवयीन मुलीला कुर्ला येथील एका ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने तिच्या आईला घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
पीडित मुलीला तातडीने मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. सध्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चुनाभट्टी पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध बीएनएस कायद्याच्या संबंधित कलमांखाली, कलम 64 आणि 65(2), तसेच मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा -Pune Rape Case: बोपदेव घाटात फिरण्यासाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार, तीन आरोपींवर गुन्हा दाखल)
आरोपी मुलांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दोघांना बालसुधारगृहात पाठवले आहे. चुनाभट्टी पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे लहान मुलांची असुरक्षितता आणि भविष्यात असे गुन्हे रोखण्यासाठी अधिक दक्षता आणि जागरूकता आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे.
शाळेच्या शौचालयात तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार -
दोन दिवसांपूर्वी मुंबई शहरातील बांगूर नगर परिसरात तीन वर्षांच्या मुलीवर शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पीडितेच्या जबाबाच्या आधारे, बांगूर नगर पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना शाळेच्या शौचालयात घडल्याचे पीडित मुलीने सांगितले. तथापि, शाळेतील अधिकाऱ्यांचा दावा आहे की, शाळेत कोणताही पुरुष कर्मचारी काम करत नाही. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि शाळेतील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत.