Image For Representation (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र्र (Maharashtra) राज्याच्या सीमेवर असणाऱ्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील पाच गावांनी आपल्याला तेलंगणा (Telangana) राज्यात समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत प्रस्ताव मांडण्यासाठी संबंधित 5 गावातील विविध पक्षांचे नेते व प्रतिनिधींनी काल (17 सप्टेंबर) रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेकर राव (K.Chandrashekhar Rao) यांची भेट घेतली तसेच, गावांच्या विलिनिकरणाची मागणी करत महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णयही घेतल्याचे समजत आहे. नांदेड जिल्ह्यातील नालगाव, भोकर, डिग्लूर, किनवट आणि हाथगाव या पाच गांवांची ही मागणी असून तेलंगण सरकारतर्फे लागू करण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांनी आकर्षित होऊन गावकऱ्यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

तेलंगण मुख्यमंत्री कार्यलयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या पाच गावातील लोकांनी तेलंगण सरकार राबवत असलेल्या योजना आपल्या गावात राबवण्याची विनंती केली आहे. जर का महाराष्ट्र्र राज्य सरकार या योजना राबवण्याच्या तयारीत नसेल तर पर्याय म्हणून या गावांनी तेलंगणा राज्यात विलीन होण्याची मागणी केली आहे. यापैकी एक पर्याय न निवडल्यास आम्ही यावर आंदोलन करू तसेच चंद्रशेखर राव यांनी आम्हाला संधी दिल्यास तेलंगणा राष्ट्र समितीच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत उतरू असा इशारा सुद्धा या गावांनी दिला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री राव यांच्या भेटीसाठी गेलेल्या पक्षकार्यकर्त्यांनी नांदेड जिल्ह्यातील हा भाग निझामाच्या काळात हैद्राबाद अंतर्गत येत होता, त्यामुळे तेलंगणा येथील लोकांशी त्यांचे सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध आहेत, याशिवाय तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक सुविधा अजूनही महाराष्ट्रात नसल्याचे असे स्पष्टीकरण दिले आहे.