पुण्यातील उंद्री परिसरात ड्रग्सचा व्यवसाय तेजीत सुरु असल्याची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. या प्रकरणी एका नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 88 लाखांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. शोलाडॉये सॅम्युअल जॉय (वय 44) असे या व्यक्तीचे नाव आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आरोपी बिझनेस व्हीजा घेऊन भारतात आला होता. कपड्यांचा व्यवसाय करणार असल्याचे सांगत त्याने भारताचा व्हीजा मिळवला होता. मात्र पुण्यातील एनआयबीएम रोड, उंद्री या उच्चभ्रू वस्तीत तो कोकेन विकत असल्याचे अधिक तपासणीतून समोर आले आहे. (गोवा: काँग्रेस आमदाराने 50 लाखात विकत घेतली अल्पवयीन मुलगी, ड्रग्स देऊन बलात्कार केल्याचा आरोप, करावा लागणार चौकशीचा सामना)
उंद्री परिसरातील कप्स्टोन सोसायटीत भाड्याने राहत असलेल्या या आरोपीकडून 88 लाखांच्या कोकेनसह, 733 ग्राम सोने, 3 लाख 68 हजाराची रोख रक्कम, 5 मोबाईल, 3 महागडी घड्याळे असा एकूण 92 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
कोकेन कुठून आणले, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का? अशी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.