Coronavirus In Mumbai: मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी, महापालिकेने उच्च न्यायालयाला सांगितले कारण
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबईतील (Mumbai) कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती सुधारताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मुंबईत चांगल्या पद्धतीने लसीकरण सुरू आहे. मुंबईत आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर, 82 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने दिले आहे.

मुंबई महानगरपालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले की, पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या 2,586 लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. तर अशाच 3,942 लोकांना त्यांचा पहिला डोस देण्यात आला आहे. मुंबईतील लसीकरण सुरळीत चालू आहे. लशींची आता कमतरता नाही. मुंबई सुरक्षित असून तिसरी लाट येताना दिसत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- CM Uddhav Thackeray: उघडलेली शाळा पुन्हा बंद होणार नाही याची दक्षता घेऊ, मुख्यमंत्र्यांचे अवाहन

सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात वकील धृती कापडिया आणि कुणाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. जनहित याचिकेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यात आली होती की, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या लोकांचे घरोघरी लसीकरण करावे.

याचिकेत पुढे असे म्हटले होते की, असे लोक घराबाहेर पडून लसीकरण केंद्रांवर जाण्याच्या स्थितीत नाहीत. केंद्र सरकारने यापूर्वी सांगितले होते की, ते लोकांना घरोघरी जाऊन लसीकरण करू शकणार नाही परंतु गेल्या महिन्यात त्याला मान्यता दिली.

महाराष्ट्र सरकारने ऑगस्टमध्ये सांगितले की ते मोहीम सुरू करेल आणि पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून अंथरुणाला खिळलेल्या लोकांचे घरोघरी लसीकरण सुरू करेल. सोमवारी कपाडिया यांनी खंडपीठाला सांगितले की, ही याचिका दाखल करण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. केंद्राने अशा व्यक्तींना घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे धोरणही तयार केले आहे.