Mumbai Airport (PC - Wikimedia commons)

Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) ज्वलनशील पदार्थ (Flammable Hydrogen Substances)बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ते मुंबईहून इथियोपियाची राजधानी आदिस अबाबाला जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. समीर विश्वास, बिश्वभाई उर्फ ​​विश्वनाथ सेंगुतार, नंदन यादव, अखिलेश यादव, सुरेश सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता विमानतळाच्या टर्मिनल 2 वरून हे चौघे मुंबईहून आदिस अबाबाला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जात होते. (हेही वाचा:Mumbai Airport Gold Seized: मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; 9 कोटींचं सोनं जप्त, 7 जणांना अटक )

याआधी 17 जुलैरोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत 13.24 किलो सोन्याची वाहतूक करणाऱ्या 7 जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली होती. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल 9 कोटींच्या घरात असून त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा देखील समावेश आहे. त्याआधी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 69 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली होती. जेद्दाहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय 192 मधून सोन्याची तस्करी करण्यात आली होती. आरोपीने त्याच्या प्राइवेट पार्टमध्ये सोने लपवले होते.