महाराष्ट्राची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मिळणारे रोजगार हे अत्यंत अल्प आहेत. त्यामुळे बेरोजगारीच्या (Unemployment) भीषण समस्येचा सामना महाराष्ट्रातील कित्येक होतकरु तरुणांना करावा लागत आहे. त्याचेच एक ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्रातील केवळ 32 हजार सरकारी जागांसाठी 32 लाख लोकांनी अर्ज भरल्याचे कटू सत्य समोर आले आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, 31,888 सरकारी नोकरीच्या (Government Jobs) जागांसाठी 32 लाख उमेदवारांनी अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
त्यात ग्रामीण विकास विभागासाठी 13,514 गरजूंनी अर्ज भरले आहेत. यासाठी केवळ 729 जागा असल्यामुळे उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे पशुसंवर्धन विभागासाठी 452 रिक्त जागा असून त्यासाठी 3.3 लाख मुलांचे अर्ज भरण्यात आले आहे.
तसेच 31,888 जागा या महाराष्ट्र सरकारच्या 13 वेगवेगळ्या विभागांमध्येही करण्यात आले आहे. ज्यात मत्स्यव्यवसाय, शेती वभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, वित्त विभाग यांसारख्या विभागांचा समावेश आहे. मात्र ही अर्ज करणा-या उमेदवारांची आकडेवारी पाहता सरकारी नोकरी मिळणे सध्याच्या जगात किती अवघड आहे, हे यावरुन स्पष्ट दिसून येतय.
सध्या खाजगी नोक-यांमध्ये कर्मचा-यांना कमी करण्याच्या प्रकारापासून कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशात नोकरीबाबत काहीच शाश्वती असलेल्या या खाजगी नोक-यांपेक्षा विश्वासार्ह अशा सरकारी नोक-यांकडेच तरुणांचा कल असतो. खाजगी नोक-यांमध्ये खूप आव्हान असली तरीही नोकरीची शाश्वती ही फक्त सरकारी नोक-यांमध्ये आहे. त्याचाच परिणाम नोकरीसाठी अर्ज करणा-या अर्जदारांच्या आकडेवारी वरुन दिसत आहे.
त्यात सध्या सुरु केलेले सातवा वेतन आयोग आणि खाजगी नोक-यांच्या तुलनेत सरकारी नोकरदारांना मिळणा-या सुविधा खूपच चांगल्या असल्याने अनेकांचा कल हा सरकारी नोक-यांकडे असतो.