Representational Image (Photo credits: PTI)

अमरावतीतील चांदूरमधील महिला कला वाणिज्य महाविद्यालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका प्राध्यापकांनी विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ घेण्यास लावली. या प्रकरणी 3 प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या या अजब प्रकारामुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकाराचा विद्यार्थिनी तसेच पालकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईनंतर विद्यार्थीनींनी महाविद्यालयाला कुलुप लावुन बाहेर आंदोलनाचा सुरूवात केली आहे. तीन प्राध्यापकांचे निलंबन जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत महाविद्यालयातील सर्व तासिकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून महाविद्यालयाला टाळं ठोकणार असल्याचा आक्रमक पवित्रा येथील विद्यार्थिनींनी घेतला आहे. त्यामुळे आता महाविद्यालय तसेच संस्थेतर्फे कोणती भुमिका घेतल्या जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Valentine's Day: अमरावती येथील शाळेत विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ, 'हे फक्त मुलींनाच का?' पंकजा मुंडे यांचा सवाल

ही घटना घडली होती 14 फेब्रुवारीला. व्हॅलेंटाईन डे दिनाचे औचित्य साधून या महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थिनींना शपथ घेण्यास लावली. ‘ना प्रेम करणार ना प्रेमविवाह’ तसंच हुंडा न देता लग्न करण्याचा निश्चयही यावेळी मुलींनी केला होता.

त्यात समाजाच्या बुरसटलेल्या हुंडा पद्धतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी हुंडा न देण्याची शपथ मुलींना घेण्यास लावली. मात्र प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली लावल्याने येथील विद्यार्थिंनींना धक्काच बसला.

या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रश्न उपस्थित करत मुलींनीचं अशी शपथ का घ्यावी ? असा सवाल केला होता. तसेच शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचित्र प्रकार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.