पुणे: हिंजवडी आयटी पार्कमध्ये दीवे लावतामा शॉक लागून 3 कामगारांचा मृत्यू
3 labourers death due to electric shock (PC-Twitter)

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi  IT Park) परिसरात विजेचे दिवे लावत असताना शॉक लागून 3 कामगारांचा मृत्यू (Labourers Death) झाला आहे. सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या कामगारांमध्ये 2 सख्या भावांचा समावेश आहे. सागर आयप्पा माशाळकर (वय-20), सागर कुपू पारंडेकर (वय-19), राजू कुपू पारंडेकर (वय-35) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.

हिंजवडी आयटी पार्कमधील फेज 3 येथे खासगी कंत्राटदारामार्फत पथदिवे लावण्याचे काम सुरू होते. हे तीन कामगार रस्त्यावर नव्याने लावलेल्या पथदिव्यावर दिवे बसविण्याचे काम करत होते. रोलर शिडी ढकलत असताना वर वीज प्रवाह सुरू असलेल्या विद्युत तारांना या शिडीचा स्पर्श झाला. त्यामुळे शिडीत वीजपुरवठा उतरल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आणखी एक जण गंभीर जखमी आहे. (हेही वाचा - नाशिक: आजारपणाला कंटाळून भाजप नगरसेविका शांता हिरे यांची विष प्राशान करून आत्महत्या)

या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत वीज पुरवठा खंडित करून चिटकेलेले मृतदेह बाजूला केले. या घटनेत जखमी झालेल्या कामगारावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास करण्यात येत असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.