Maharashtra Covid-19 Update: राज्य सरकारने गुरुवारी जारी केलेल्या आरोग्य बुलेटिननुसार महाराष्ट्रात 29 नवीन कोविड -19 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार 24 ऑगस्ट रोजी 19 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 80,21,835 झाली आहे.
राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 98.18 टक्के आहे. सध्या महाराष्ट्रात 144 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे, यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. दरम्यान, 24 ऑगस्ट 2023 रोजी 2,166 चाचण्या घेण्यात आल्या, त्यापैकी 1,620 चाचण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये केल्या गेल्या. तसेच 546 चाचण्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये केल्या गेल्या. (हेही वाचा -Zika Virus in Mumbai: मुंबईत झिका व्हायरसच्या पहिल्या रुग्णाची पुष्टी; नागरिकांनी घाबरून न जाण्याचे BMC चे आवाहन)
सध्या Covid चा Omicron XBB.1.16 स्ट्रेन सक्रिय आहे. एकूण 1733 जणांना या प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले. या प्रकाराच्या प्रकरणांमध्ये 19 मृत्यूची नोंद झाली आहे. 1 जानेवारी 2023 पासून, 127 कोविड-19 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 72.44 टक्के मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये झाले आहेत. तर 84 टक्के मृत व्यक्तींना कॉमोरबिडीटीज होते आणि 16 टक्के लोकांमध्ये कोणतेही आजार नव्हते.
गुरुवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात एकाच दिवसात 54 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची वाढ झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 1,484 वर पोहोचली आहे. याशिवाय मृतांची संख्या 5,31,926 इतकी नोंदवली गेली. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,63,376 झाली आहे आणि राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे.