मुंबई विमानतळावरुन 240 विमानांची उड्डाणे रद्द; तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता
Representational Image (Photo Credits: Youtube Screenshot)

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Mumbai Chhatrapati Shivaji International Airport) प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काहीशी गैरसोय होऊ शकते. 7 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आठवड्यातील तीन दिवस (मंगळवार, गुरुवार व शनिवार) 6 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दररोज तब्बल 240 विमानांची उड्डाणे रद्द होणार असल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक विमानांच्या मार्गातही बदल करण्यात येतील.

काही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांचा मार्ग बदलण्यात येणार आहे. तर काही विमानांच्या वेळा बदलल्या जातील. या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रद्द केलेल्या विमानांच्या प्रवाशांना दुसऱ्या विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. (साईभक्तांसाठी SpiceJet ची खास विमानसेवा सुरु)

विमानफेऱ्या रद्द कधी होणार?

7 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान प्रत्येक आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्ट्या सहा तासांकरीता बंद राहतील.

मात्र 21 मार्च रोजी गुरुवार असूनही होळी असल्याने विमानतळावरील धावपट्टी सुरु ठेवण्यात येईल.

या निर्णयामुळे तिकिटदरात वाढ होण्याची शक्यता

धावपट्टी बंद असल्याने विमानफेऱ्यांवर परिणाम होणार आहे. यामुळे मुंबई-दिल्ली, मुंबई-गोवा, मुंबई-बंगळुरु या प्रवासाच्या तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिकीट दरात सुमारे 70-80% वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर विमानांच्या तिकीटांत 25-35% वाढ होऊ शकते.