![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/hgffff.jpg?width=380&height=214)
Nashik Shocker: नाशिक जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. व्हॅलेंटाईन डेला काही दिवस बाकी असताना आज सकाळी नाशिक (Nashik) मधील गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅकवर एका मुलीवर चाकूहल्ला झाला. एका 20 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकरासोबत फिरत असताना तिच्या ओळखीतील एका तरुणाने हल्ला केला. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, अशोकस्तंभ येथील रहिवासी असलेली ही तरुणी तिच्या प्रियकरासोबत जॉगिंग करत होती. यावेळी हल्लेखोराने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या हल्लेखोराने तरुणीच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली.
तरुणीचा आवाज ऐकून ट्रॅकवरील इतर लोक तिच्या मदतीला धावले. काहींनी हल्लेखोराला पकडले आणि त्याला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. तथापी, हल्ल्यात सहभागी असलेला आणखी एक तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तरुणीला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. (वाचा - Mumbai Crime News: अल्पवयीन मुलीवर महिलेकडून लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक, POCSO Act अन्वये गुन्हा दाखल)
दरम्यान, पीडित तरुणीचे सीटी स्कॅन करण्यात आले आणि नंतर तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले की, तरुणीची प्रकृती गंभीर असून शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईल. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, हा हल्ला प्रेम प्रकरणातून करण्यात आला असावा. (हेही वाचा, Mumbai Crime: कुर्ला हादरले! मोठ्या बहिणीवर जास्त प्रमे असल्याच्या रागात लेकीचे वृद्ध आईवर चाकूने वार; मुलीला अटक)
तथापी, पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, हल्लेखोर तरुणीला ओळखत होता. तरुणीचा तिच्या प्रियकराशी असलेल्या संबंधांमुळे तो नाराज असावा. त्यामुळे त्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. या घटनेने नाशिक शहरात भीतीचे वाचावरण निर्माण झाले असून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.